|गुरुपद आणि गुरु पदाचे महत्व |Guru Pada and Importance of Gurupada
!! ॐ चैतन्य नवनारायनाय नमः !! |गुरुपद आणि गुरु पदाचे महत्व |Guru Pada and Importance of Gurupada![]() |
|गुरुपद आणि गुरु पदाचे महत्व |Guru Pada and Importance of Gurupada |
|| सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरू का ध्यास ! ||
आज आपण गुरुपद आणि त्याचे महत्त्व या विषयावर माहिती पाहणार आहोत. गुरू पदाची प्राप्ती होणे हा काही सोपा विषय नाही त्यासाठी आपल्याला आधी कोणत्यातरी योग्य असा गुरुचे निस्सीम शिष्य व्हावे लागते. गुरु आपल्या शिष्यासाठी मोक्षाचे द्वार खुले करत असतात. गुरु शिवाय ईश्वराची प्राप्ती होत नसते. आपल्या भारतभुमी मध्ये अशा अनेक गुरु शिष्यांचा उल्लेख करता येईल ज्यांनी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून व त्यांची एक निष्ठेने सेवा करून त्यांनी दिलेले ज्ञान व साधनेच्या जोरावर अखंड गुरु पदाची प्राप्ती केलेली आहे उदाहरण द्यायचे म्हटले तर गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली यांचे देता येईल.
" गहिनीप्रसादे निवृत्ती दातार ! ज्ञानदेवा सार चोजविले !!"
सर्वप्रथम नाथ संप्रदायातील महान योगी गहिनीनाथांनी श्रीनिवृत्तीनाथांना दीक्षा दिली. त्यांना सकाळी ज्ञान दिले. त्या जोरावर त्यांनी गुरु पदाची प्राप्ती करत माऊलींसारखा शिष्य घडविला. माऊलींनी या संसाराचे गुरुपद घेऊन या समस्त संसाराची अध्यात्मिक विचारधाराच बदलवून टाकली. ज्यासाठी हा संसार त्यांचा नेहमीच ऋणी राहील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माऊलींची कीर्ती आहे हे एवढे सर्व प्राप्त झाले ते फक्त गुरु कृपेमुळे. ही कृपा प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यातील सर्व मी तू पण नाहीसे झाले सर्व चराचर ब्रह्म स्वरूप दिसू लागले आणि ते म्हणतात.
"तुझा तूं चि देव तुझा तूं चि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्वी ॥"
गुरुपद प्राप्ती ही एक स्थिती आहे, जी जीवनात आल्यावर तुमच्यातील अज्ञान अहंकार दूर होतो. सर्व प्रकारचे ताप शांत होतात. या स्थितीतच तुम्हाला भगवंताने निर्माण केलेली माया ओळखता येते. "ज्याप्रमाणे आकाशातून पावसाचे पाणी पडते तेव्हा ते नदी, नाले, डोंगर, दरी, दगड, इत्यादीवर सारखेच पडते. परंतु पर्वतावर, दगडांवर पाणी भरून राहत नाही. त्याउलट नदी, नाले, खळगे इत्यादी मध्ये पाणी भरून राहते. अगदी त्याच प्रकारे गुरूंच्या सान्निध्यात राहून त्यांनी केलेल्या ज्ञानाचा वर्षाव स्वतःमध्ये भरून घेऊन गुरू पदाची प्राप्ती करता येते."
पण सध्याच्या काळात पाहिले तर अनेेक असे स्वघोषित गुरु निर्माण झालेले आहेत. त्यामुळे गुरु-शिष्य परंपरेत जमीन-अस्मानचा फरक पडलेला आहे. कलियुगात असे बरेच लोक आहेत की ज्यांनी अनेक ठिकाणाहून पुस्तके वाचून माहिती मिळवून ज्ञान संपादन केलेले आहे. त्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतलेले असतात. परंतु भौतिक परिस्थिती चे संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या पुस्तकी ज्ञानात कमतरता राहते आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रसंगी बऱ्याच ठिकाणी मान खाली घालण्याची वेळ येते. एवढे सर्व असूनही काही साधक आपल्या बुद्धीचे तारे तोडत स्वघोषित गुरुपद घेतात. पण एक लक्षात ठेवा आपण होऊन घेतलेले गुरुपद हे दुधारी तलवारीसारखे असते ज्यामुळे आपले व दुसऱ्याचे नेहमी नुकसानच होत असते. स्वतः गुरु नकरता गुरुपद घेऊन इतरांना एखादी साधना, एखादा उपाय करायला लावणे म्हणजे त्याच्या नशीबाचे दोष आपल्यावर ओढून घेण्यासारखे असते.
आपण आपली साधना, भक्ती, उपासना इतकी प्रखर करा की त्यामुळे आपल्याला भगवंत कृपेने योग्य गुरुची प्राप्ती होईल आणि ते प्रसन्न होऊन ज्यावेळी आपल्याला अनुग्रह देतील व आज्ञा देतील तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला गुरू पदाची प्राप्ती होते आणि दुसऱ्याला उपासना, साधना , काही कर्मकांड देण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जरी आपल्याला अनुग्रह मिळाला व गुरु गादीची प्राप्ती झाली तरी कोणालाही साधना देताना, एखादे अध्यात्मिक कार्य करताना त्याचा मोबदला घेऊ नये. मोबदल्याची आसक्ती ठेवून एखाद्याला साधना देणे किंवा एखाद्या ठिकाणी कर्मकांड करणे आपल्यासाठी हानिकारक असते. याचे फार वाईट फळ भोगावे लागतात.
याउलट एखादा साधक जर असे म्हणत असेल की, मी स्वतः समर्थ आहे मला इतर कुठल्याही व्यक्तीची गुरु म्हणून गरज नाही ते साधक भगवंताच्या नजरेत गुरु द्रोही ठरतात. अशा साधकाचा शेवट खूपच भयानक होतो. म्हणून आपल्या साधुसंतांचे म्हणणे आहे की, गुरू प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या छत्रछायेखाली साधना करत राहणे हे फार उत्तम होय. उगाच इतरांच्या सांगण्यावरून किंवा इतरांनी आपली थोडी प्रशंसा केल्यावर गर्वाने फुगून स्वघोषित महाराज बनणे किंवा गुरु बनणे हिताचे नाही.
कोणत्याही साधनेच्या पूर्णतेसाठी, ती साधना यशस्वी होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. कारण आपल्या शिष्याची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या सद्गुरुवर असते म्हणून नेहमी सद्गुरूंच्या संपर्कात रहा. त्यांच्या संपर्कात न राहता आपण गुरु पदाचा अभिमान मिरविणे आपणास फार नुकसान कारक होऊ शकतो. शिष्याने नेहमी साधे आणि सरळ जीवन जगावे. जर साधक गुरु पदाच्या अहंकाराने भरून अधिक उंचावर गेला तर तो मोक्षापासून दूर होतो आणि तो अधःपतनाला कारणीभूत ठरतो.
गुरू पदाची गादी म्हणजे एक प्रकारचे काटेरी आसन आहे. आणि या काटेरी आसनावर विराजमान होऊनच आपल्याला सर्वसामान्य जनतेची दुःखे दूर करावयाची असतात. या काटेरी आसनावर बसण्याचे सामर्थ्य आपल्यात यावे म्हणून गुरुची सेवा करून ती शक्ती अर्जित केली पाहिजे. त्यासाठी योग्य तो गुरु असला पाहिजे. आपल्या साधुसंतांनी म्हटले आहे की,
पाणी पिना छान के, गुरु करना जानके...!
एक गोष्ट निसंकोच पणे सांगता येईल की, गुरू पदाची प्राप्ती होणे ही शिष्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. "ज्याप्रमाणे एखादी नदी उगमापासून वाहत जाऊन रस्त्यात येणारे सर्व अडथळे पार करत ती शेवटी समुद्राला जाऊन मिळते आणि स्वतः समुद्राचा स्वरूप धारण करते. त्याचप्रमाणे एक खरा साधक आपल्या गुरुंशी एकनिष्ठ राहून, त्यांच्याकडील ज्ञान अर्जित करत गुरूंचे स्वरूप प्राप्त करतो त्यालाच गुरू पदाची प्राप्ती होणे असे म्हणतात."
छान लेख,,सुंदर मांडणी,,शब्द रचना उत्तम
ReplyDeleteDhnywad
Delete